फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेच्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला असून पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या आ.सचिन पाटील यांना सातव्या फेरीत फक्त माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या पेक्षा फक्त पाचशे मते कमी पडली मात्र आमदार सचिन पाटील यांनी आघाडी मात्र कायम ठेवत आमदारकी खेचून आणली व राजे गटाला चांगलाच हादरा देत विजयश्री प्राप्त केली.
सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त गाजला व पाहिला तो मतदारसंघ फलटण- कोरेगाव हा मतदारसंघ,विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अलिप्त राहिले व त्यांचे दोन्ही बंधू श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अत्यंत चुरशीच्या झालेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक चव्हाण यांचा 17046 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला.
फलटण तालुक्यात 29 वर्षांनी राजे गटाच्या हातून विधानसभा गेली असून चौथ्यांदा आमदारकी मिळत नाही हे पुन्हा तालुक्यातील जनतेने दाखवुन दिले.माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नेतृत्वाखाली खासदार गटाने परिवर्तन घडवित लोकसभा निवडणुकीतिल झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. सलग चार वेळा आमदार निवडून देण्याचा योग यावेळी सुद्धा फलटणकरांनी येऊ दिलेला नाही.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चर्चेची व दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याची प्रतिष्ठेची झालेली होती. गेले तीस वर्ष फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे मात्र या विधानसभा निवडणुकीत या सत्तेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छेद देत त्यांचे कट्टर समर्थक सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलेले आहे.
दरम्यान आज सकाळी येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी घेतलेली आघाडी आमदार दीपक चव्हाण यांना तोडता आले नाही ही आघाडी हळूहळू सचिन पाटील यांनी वाढवत नेली. जस जसे आघाडी वाढू लागली तसतसे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला कार्यकर्त्यांनी फलटण शहरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलालांची जोरदार उधळण करीत माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
या निवडणुकीमध्ये निरा देवघर,पाणी प्रश्न,कमिन्स कंपनीमधील कामगारांचा पगाराचा मुद्दा फलटणची बारामतीशी केलेली तुलना,रस्ते ,आरोग्य हे प्रश्न माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात मांडून जनतेचा कौल मागितला होता.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाच लेखाजोखाही मांडला होता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा प्रभावी प्रचार खासदार गटाने केला होता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना राजेगटाकडून प्रभावी उत्तर देणे जमलेच नाही.सारासार सर्व गोष्टींचा विचार करून जनतेने आपला कौल विकासासाठी दिला.
रासपचे उमेदवार दिगंबर आगवने यांनी जेलमधून ही निवडणूक लढवली होती मात्र त्यांना सहानुभूती मिळाली नाही तर एकच निर्धार बौद्ध आमदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार जेष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांना जनतेने स्वीकारले नसल्याचे स्पष्ट दिसून आले व इतर उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
Back to top button
error: Content is protected !!