फलटण दिनांक ८ ( प्रतिनिधी )आषाढी वारीने श्री विठ्ठल भेटीस निघालेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मजल दरमजल करीत दोन दिवसापुर्वी लोणंद मुक्कामी पोहोचला होता . अडीच दिवसाच्या लोणंद मुक्कामी माउलींच्या दर्शनासाठी कर्नाटक राज्यासह कोल्हापूर , सातारा , सांगलीसह कोकण भागातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती . आळंदी ते लोणंद हा वाटचालीतील अर्धा टप्पा पुर्ण करुन आज ( सोमवार ) हा सोहळा दुपारी १ . ३० वाजता तरडगावकडे मार्गस्थ झाला . ढगाळ वातावरणात वारक -यांची वाटचाल सुखकर होत होती . टाळ मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला होता . मध्येच येणारी पावसाची सर वाटचालीत उत्साह निर्माण करीत होती . वारक-यांची पावले पहिल्या उभ्या रिंगणासाठी चांदोबाचा लिंबकडे पडत होती . पोलिसांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत केल्याने तसेच लोणंद नगरपंचायतीने अडीच दिवस आरोग्य , वीज , पाणी पुरवठा आदी सुविधा व्यवस्थित पुरविल्याने वारक-यांना कोठेही त्रास झाला नाही .
फलटण तालुक्यात स्वागत
माउलींच्या पालखी सोहळ्याने अडीच वाजता कापडगांव येथे फलटण तालुक्यात प्रवेश केला . येथेमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर , आ दीपक चव्हाण , प्रांताधिकारी सचिन ढोले , तहसीलदार डॉ अभिजीत पाटील यांच्यासह प्रशासनाने सोहळ्यासह वैष्णवांचे स्वागत केले .
अश्वांची नेत्रदीपक दौड
पहिल्या उभ्या रिंगणासाठी माउलीचा मोती व स्वाराचा हिरा अश्व दुपारी ३ . ३० वाजता चांदोबाचा लिंब येथे पोहोचले . त्यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह लाखोंचा दळभार घेवुन माउलीचा रथ सायंकाळी ४ वाजता पोहोचला . उध्दव चोपदार यांनी रस्त्याच्या दुतर्फा दिंड्या उभ्या केल्या . भोसरीच्या राजश्री भागवतने रांगोळ्याच्या सुंदर पायघड्या घातल्या आणि सायंकाळी सव्वाचार वाजता रिमझीम पावसाच्या सरी अंगावर झेलीत अश्वांनी माउली माउली नामाच्या जयघोषात नेत्रदीपक दौड सुरु केली . अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले . अश्व रथा मागील ३२ दिंड्यांपर्यंत धावले . रथाजवळ आल्यावर अश्वानी माउलींचे दर्शन घेतले . प्रमुख विश्वस्थ ॲड राजेंद्र उमप व विश्वस्थ भावार्थ देखणे यांनी रथाचे सारथ्य केले . आरतीनंतर पावसातच दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले . सायंकाळी सोहळा तरडगाव मुक्कामी पोहोचला .
तळावर चिखल
रविवारी रात्री तरडगाव परिसरात पाउस झाल्याने पालखी तळ चिखलमय झाला होता . वारक-यांना राहुट्या लावणेही अशक्य झाले होते . माउलींची पालखी जेथे मुक्कामी थांबते तेथेही चिखल झाला होता . सोमवारी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ , व्यवस्थापक माउली वीर यांनी तळाला भेट देवून प्रशासनाला सुचना केल्या . या परिसरात मुरुम टाकल्याने तळ मजबुत झाला . याच तळावर सोहळा विसावला .
ड्रोन पडून महिला जखमी
संतांच्या पालखी सोहळ्याचे , रिंगणाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करु नये असे पोलिस प्रशासनाने कळवूनही आज चांदोबाचा लिंब येथील रिंगण सोहळ्याचे वेळी १२ अनधिकृत ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरु होते . त्यापैकी अश्व ३२ क्र्मांकाच्या दिंडीजवळ येताच एक ड्रोन पडत्या पावसात कोसळले व त्याचा मार दिंडीतील एका महिलेच्या तोंडाला लागला व त्यात ती जखमी झाली . ड्रोन कोनाचा होता हे मात्र कळले नाही .
Back to top button
error: Content is protected !!