मुंबई – राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला महाविकास आघाडीतील उमेदवारीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आघाडीतील अंतर्गत चर्चा, तर्क-वितर्क आणि संभाव्य नावांची यादी आता इतिहासजमा झाली आहे.
शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने महाविकास आघाडीने अनुभव, राजकीय वजन आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रभाव यालाच प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते. पवार यांची संसदीय कारकीर्द, केंद्र व राज्य पातळीवरील राजकारणातील पकड आणि विरोधकांनाही अडचणीत टाकणारी रणनीती पाहता, ही उमेदवारी आघाडीसाठी ‘सेफ पण स्ट्राँग’ मानली जात आहे.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी जाहीर होताच आघाडीतील नेत्यांनी समाधान व्यक्त केले असून, येणाऱ्या निवडणुकीत ही लढत प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, या घोषणेमुळे भाजप आणि इतर विरोधी पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला असून, राज्यसभेच्या निवडणुकीत आता थेट राजकीय शक्तिपरीक्षा पाहायला मिळणार आहे. शरद पवार यांच्या नावानेच महाविकास आघाडीचा ‘ट्विस्ट’ संपला असून, राजकारणात पुन्हा एकदा अनुभवाची चाल किती प्रभावी ठरते हे दाखवण्याची संधी त्यांना मिळाली आहे.