फलटण – राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आता सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शासनाने अधिकृत आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, सातारा जिल्हा परिषद तसेच अंतर्गत पंचायत समित्यांची पहिली सभा २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १३५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाकडे संख्याबळ आहे, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अध्यक्षपद कुणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सातारा यांना शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्या असून, लवकरच जिल्हा परिषद सभेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा सारीपाट नेमका कुणाच्या हातात जाणार, याचा फैसला आता काही दिवसांतच होणार आहे.