फलटण दिनांक २४ ( प्रतिनिधी )वाठार निंबाळकर ता. फलटण येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.अतिशय भरधाव वेगात चालवल्याने गाडीवरील ताबा सुटून गाडी पुलाच्या कठड्याला जोरात धडकून सदर अपघात झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नयन अमरजित लोंगाणी (वय २८, मूळ रा. तारकपूर, अहिल्यानगर, सध्या रा. कमिन्स हॉस्टेल, वाठार निंबाळकर) हे सप्टेंबर २०२५ पासून कमिन्स कंपनी, सुरवडी, ता. फलटण येथे नोकरीनिमित्त आले आहेत. त्यांच्यासोबत कंपनीतील इतर कर्मचारी हॉस्टेलवर राहतात.
दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजता ते नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेले. दुपारी ३ वाजता काम संपवून हॉस्टेलवर परतले.
सायंकाळी हॉस्टेलमध्ये राहणारे त्यांचे मित्र सौरभ कुमार (रा. झारखंड), एम.डी सितारे (रा. बिहार), मोहम्मद हुसेन (रा. अयोध्या, उत्तरप्रदेश), अनिल हेबरम (रा. जमशेदपूर, झारखंड) आणि सदानंद पुर्ती (रा. जमशेदपूर, झारखंड) असे सर्वजण सह्याद्री हॉटेल, बडेखान, ता. फलटण येथे जेवायला जाण्याचे ठरले.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. MH 16 ET 1756) या गाडीतून जेवणासाठी गेले. फिर्यादी नयन लोंगाणी स्वतः गाडी चालवत होते. जेवण आटोपून ते सर्वजण परत वाठार निंबाळकर येथील हॉस्टेलकडे निघाले.
हॉस्टेल जवळ आल्यानंतर मित्रांनी ताथवडे घाटाजवळ फिरून येऊ असे सांगितल्याने त्यांनी गाडी ताथवडे घाटाकडे घेतली. तेथून परत ढवळ पाटी येथे आल्यानंतर मोहम्मद हुसेन याने गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून फिर्यादीने गाडी त्याला चालवण्यास दिली.
पुसेगाव ते फलटण रोडने वाठार निंबाळकरकडे येत असताना वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत मोहम्मद हुसेन याने गाडी अतिशय भरधाव वेगात चालवल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या नालीवरील कठड्याला जोरात धडकून पलटी होऊन बाजूच्या जागेत पडली.
या अपघातात फिर्यादी गाडीबाहेर फेकले गेले. त्यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागला. इतर मित्र गाडीत अडकून पडले. त्यांनी तात्काळ हॉस्टेलचे सिक्युरिटी आणि रेक्टर ज्योती भार्गवी यांना फोन करून अपघाताची माहिती दिली.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले आणि अॅम्ब्युलन्सने फलटण येथे उपचारासाठी नेले.
यामध्ये उपचारादरम्यान मोहम्मद हुसेन रा. अयोध्या, उत्तरप्रदेश (चालक), अनिल हेबरम रा. जमशेदपूर, झारखंड,सदानंद पुर्ती रा. जमशेदपूर, झारखंड हे तिघेजण मृत्यू पावले असून
सौरभ कुमार रा. झारखंड, एम.डी सितारे रा. बिहार, नयन अमरजित लोंगाणी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत
फिर्यादीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, सदरचा अपघात हा चालक मोहम्मद हुसेन याने भरधाव वेगात आणि रोडचा अंदाज न आल्याने गाडी कठड्याला धडकून झाला असून, यात त्याच्या स्वतःच्या व इतर दोन मित्रांच्या मृत्यूस आणि तिघांच्या दुखापतीस तोच कारणीभूत आहे.
पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

