फलटण : सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि रुग्णसेवेचे व्रत जपत कार्यरत असलेल्या लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल, फलटण यांच्यावतीने आज एकाच दिवसात तब्बल ३७ यशस्वी फेको लेझर नेत्रशस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. हॉस्पिटलच्या दृष्टीने हा एक अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद टप्पा असून फलटण शहरासह संपूर्ण तालुक्याच्या आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ही उल्लेखनीय कामगिरी आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून हॉस्पिटलचे चेअरमन श्री. अर्जुन घाडगे, सचिव श्री. चंद्रकांत कदम, लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी वर्ग यांनी घेतलेले अथक परिश्रम, नियोजनबद्ध कामकाज आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा यामुळे आज हॉस्पिटलने सेवाकार्याचा विश्वासार्ह टप्पा गाठला आहे.
आज फलटण शहर व तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधील नेत्ररुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि तत्परतेने उपचार उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे हॉस्पिटल करीत आहे. विशेषतः मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी आधुनिक फेको लेझर शस्त्रक्रिया ही अत्यंत उपयुक्त आणि प्रगत उपचारपद्धती उपलब्ध झाल्यामुळे अनेक रुग्णांना नवदृष्टीचा आनंद घेता येत आहे.
या यशामागे हॉस्पिटलच्या चेअरमनपासून सचिव, सर्व कार्यकारिणी सदस्य, डॉक्टर, तांत्रिक कर्मचारी, परिचारिका आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाचे एकत्रित प्रयत्न आहेत. प्रत्येकाने आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचेच हे फलित आहे.
लायन्स क्लब परिवारासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब असून, समाजातील गरजू व सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा हा सेवायज्ञ यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास लायन्स परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
तुमची दृष्टी, आमची जबाबदारी… मोतीबिंदूमुक्त जीवनाचा आनंद घ्या!
लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल, फलटणच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चेअरमन, सचिव, सर्व कार्यकारिणी सदस्य, डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे लायन्स परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!