मोफत रक्तातील साखर तपासणी व नेत्रआरोग्य जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण : सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२६ रोजी जागतिक मधुमेह जनजागृती दिन आणि अंधत्व निवारण दिनानिमित्त दोन महत्त्वपूर्ण आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माळजाई मंदिर व उद्यान परिसरातील लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल येथे हे उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
१. मधुमेह जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
डॉ.सुभाष गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. माळजाई मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोफत रक्तातील साखरेची तपासणी (Blood Sugar Check-up) करण्यात आली.
यावेळी डॉ.सुभाष गुळवे यांनी मधुमेह होण्याची कारणे, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, मधुमेह नियंत्रणाचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित चालणे, व्यायाम करणे, संतुलित व योग्य आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या गोष्टी मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.
२. अंधत्व निवारण व नेत्रआरोग्य जनजागृती उपक्रम
अंधत्व निवारण दिनानिमित्त लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी नेत्रआरोग्यविषयक समुपदेशन व जनजागृती करण्यात आली. डोळ्यांची नियमित तपासणी, दृष्टिदोषाची वेळीच ओळख, नेत्रविकारांवरील योग्य उपचार आणि अंधत्व प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी याबाबत रुग्णांना माहिती देण्यात आली. तसेच दृष्टिदोष असलेल्या गरजू व्यक्तींना आवश्यक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून आजारांचे वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास अनेक गंभीर आजारांपासून बचाव करणे शक्य आहे. याच उद्देशाने लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिक व रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष लायन रणजीत बर्गे, लायन प्रमोद निंबाळकर, ट्रेझरर लायन दिलीप शिंदे, लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे सचिव लायन चंद्रकांत कदम, व्हाईस चेअरमन लायन रतनसीभाई पटेल, लायन मंगेशशेठ दोशी, लायन संजय दाते, लायन सुरेश भोंगळे, लायन महेश गरवालीया, लायन निखिल सोडमिसे यांच्यासह लायन्स आय हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.