Screenshot
पंढरपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उचेगाव येथील मानाचे वारकरी सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजा करण्याचा बहुमान मिळाला.
यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. बळीराजावरील संकट दूर होऊन त्याला दिलासा मिळावा, राज्यात समाधानकारक पाऊस पडून शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुबत्ता यावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाच्या चरणी केली.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, सध्याच्या कठीण परिस्थितीत शासन आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या महापूजे प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश शिंदे तसेच सहकारी मंत्री आणि कुटुंबीय उपस्थित होते. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

