विडणी येथील ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करून मिळवले यश; आई शेतात रोजंदारीवर, वडील गवंडी कामगार
फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील विडणी गावच्या कु. काजल अर्जुन जगताप यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करत मंत्रालय सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे विडणी गावासह फलटण तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
काजल यांचे वडील गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई सौ. मनिषा जगताप या शेतात रोजंदारीवर काम करतात. आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही काजल यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कठोर मेहनत आणि नियमित अभ्यास केला.
विडणी ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निर्माण केलेल्या अभ्यासिकेत काजल यांनी अभ्यास करून आपल्या यशाचा मार्ग तयार केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध झाल्यास तेही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतात, याचे काजल जगताप यांनी आपल्या यशातून उदाहरण घालून दिले आहे.
गवंडी काम करणाऱ्या वडिलांची आणि शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या आईची कन्या काजल जगताप यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या यशाबद्दल काजल हिचे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धीरज अभंग, विडणीने लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, पंचायत समिती सदस्य सचिन अभंग यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.