सांगवी,ता.फलटण | प्रतिनिधी फलटण तालुक्यातील मौजे सांगवी येथे दुर्गा दौडदरम्यान झालेल्या वादाचे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, या घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सांगवी येथे दुर्गा दौडदरम्यान वाद झाल्याची घटना घडली. या घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, ११८(१)(२), ३५२, ३५१(२) आणि ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित महिला आरोपीला अटक करण्यात आली असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर तपशील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत.
अफवांना खतपाणी घालू नका; पोलिसांचे स्पष्ट आवाहन!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून विविध प्रकारच्या चर्चा आणि अफवा पसरत असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही माहिती खातरजमा न करता पुढे पाठवणे, चुकीचे संदेश प्रसारित करणे किंवा अप्रमाणित दावे करणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित असून संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता पोलिसांना तपासात सहकार्य करावे, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
आता या प्रकरणाच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सांगवीसह फलटण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.