Screenshot
फलटण दि.22 – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची विक्री करण्यासाठी आवश्यक परवाना घेणे बंधनकारक असून, फलटण तालुक्यातील इच्छुक फटाका विक्रेत्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसील कार्यालय, फलटण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात लहान मुले, तरुण तसेच नागरिकांकडून विविध प्रकारच्या फटाक्यांची खरेदी केली जाते. मात्र, फटाक्यांची विक्री करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विक्रेत्यांना नियमानुसार परवाना घेणे बंधनकारक आहे.
फलटण शहर व ग्रामीण भागात फटाक्यांची विक्री करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. फलटण शहरात नगरपालिकेने निश्चित केलेल्या जागांवर, तर ग्रामीण भागात संबंधित ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी बिनशेती जागांवरच फटाका विक्री करता येणार आहे. यासाठी पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विहित अटी व शर्तींनुसार परवाना दिला जाणार आहे.
अग्निशमन साहित्य ठेवणे बंधनकारक
फटाका विक्रीच्या स्टॉलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक साहित्य उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. तसेच परवान्यात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. परवानगी नसलेल्या ठिकाणी फटाके विक्री करणे किंवा परवान्यातील नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मुदतीनंतरच्या अर्जांचा विचार नाही
फटाका स्टॉलसाठी अर्ज करताना पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण स्वरूपात सादर करणे गरजेचे आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तसेच मुदतीपूर्वी सादर करूनही त्रुटींची पूर्तता न केलेल्या अर्जांचा परवान्यासाठी विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
परवाना मिळाल्यानंतर त्याची प्रत दुकानात नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावावी. तसेच अग्निशमनाची आवश्यक साधने दुकानात उपलब्ध ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विनापरवाना विक्री केल्यास दुकान सील होणार
रितसर परवाना न घेता किंवा परवानगी दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फटाक्यांची विक्री केल्यास संबंधित फटाके जप्त करून दुकान सील करण्यात येऊ शकते. तसेच संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई केली जाईल. अशा प्रकारची अनधिकृत विक्री आढळल्यास नागरिकांनी तहसील कार्यालय, फलटण किंवा संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुरक्षित दिवाळीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे
दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. फटाके फोडताना कमीत कमी ध्वनी व वायुप्रदूषण होईल याची काळजी घ्यावी आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही यासाठी दक्षता बाळगावी. फटाका विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, तर नागरिकांनीही सुरक्षित व पर्यावरणपूरक दिवाळीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसील कार्यालय, फलटण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

