फलटण : – लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित नवरात्र व दसरा महोत्सवांतर्गत विजयादशमी उत्सव मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. विजयादशमी अर्थात दसरा हा सत्याचा असत्यावर विजय आणि चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या मंगलमय दिनाचे औचित्य साधून फलटणच्या परंपरेनुसार राजघराण्याचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते माळजाई देवीचे पूजन करण्यात येणार असून, त्यानंतर पारंपरिक सीमोल्लंघनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना व फलटणकर नागरिकांना आपट्याची पाने (सोन्याची पाने) वाटप करून दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. आपट्याची पाने एकमेकांना देऊन परस्परांमध्ये प्रेम, आपुलकी आणि समृद्धीची भावना जपण्याची परंपरा या निमित्ताने पुढे नेण्यात येणार आहे. या विजयादशमी उत्सवासाठी सर्व महिला भाविक व फलटणकर नागरिक आणि लायन्स क्लब फलटण परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांनी मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता माळजाई मंदिर येथे उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने करण्यात येत आहे.