फलटण (प्रतिनिधी): फलटण नगरपालिकेत सध्या प्रशासन चालतंय की ‘एका ऑपरेटरची सत्ता’—असा थेट सवाल नागरिक करत आहेत. कारण २००३ साली पंप ऑपरेटर म्हणून रुजू झालेला विनोद नावाचा कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून एकाच खुर्चीवर ‘मूळं रोवून’ बसला आहे. बदलीचे नियम, सेवा अटी, शासकीय शिस्त—हे सगळं फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण साधा ऑपरेटर असलेला हा कर्मचारी आज अनेक विभागांमध्ये ‘हुकूमशहा’सारखा हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. *पद ऑपरेटरचं… पण वावर थेट साहेबांचा!* पाणीपुरवठा विभागात काम असतानाही, संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच जास्त वेळ घालवत असल्याची चर्चा आहे. फक्त इतकंच नाही— आरोग्य विभागाला स्वतंत्र पाच SI असूनही आरोग्य विभागातही त्याचा मुक्त वावर असून, तिथल्या कामातही तो ‘हस्तक्षेप’ करत असल्याचे गंभीर आरोप आहेत. आरोग्य विभागाला स्वतंत्र अधिकारी असताना, हा ऑपरेटर नेमक्या कोणत्या अधिकारात आदेश देतो? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. *काम कमी… ‘जोडधंदा’ जास्त?* पालिकेचा पगार घेणारा हा कर्मचारी प्रत्यक्ष कामापेक्षा राजकीय नेत्यांच्या जवळ राहून ‘सेटिंग’ करण्यातच जास्त सक्रिय असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हा कर्मचारी पालिकेचा नोकर आहे की ‘दलाल’? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. *नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!* “आम्ही कामासाठी गेल्यावर अधिकारी ऐकून घेतात, पण हा ऑपरेटर आम्हालाच आदेश देतो. आम्ही नागरिक आहोत की याचे कर्मचारी?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. *राजकीय वरदहस्ताचा खेळ?* २३ वर्षे एकाच जागी टिकून राहणं हे केवळ योगायोग आहे का? की यामागे कोणाचा ‘वरदहस्त’ आहे? प्रशासनावर दबाव टाकत आणि नेत्यांच्या जवळीक वापरत हा कर्मचारी स्वतःची ‘सत्ता’ चालवत असल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्याधिकारी काय कारवाई करणार? सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर नियम लावले जातात, पण अशा ‘प्रभावशाली’ कर्मचाऱ्यांवर मात्र प्रशासन गप्प का? आता फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी या प्रकरणात चौकशी करून कारवाई करणार का? की ही ‘२३ वर्षांची सत्ता’ अशीच सुरू राहणार? फलटणकरांना आता उत्तर हवं आहे— पालिकेत नियम चालतात की ‘विनोद’ची मर्जी