सासवड हुन जेजुरीच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्या दरम्यान आज एक दुःखद घटना घडली. पायी निघालेल्या वारकऱ्यांना एका ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवार सकाळी सासवड–जेजुरी मार्गावरीळ बेलसर टोल हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर झाला.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. अपघातावेळी 7 महिला वारकरी रस्त्यावरून पायी जात असताना ट्रकने चिरडले असल्याचे समोर आले आहे. या भीषण दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.