फलटण प्रतिनिधी : फलटण शहर, मंगळवार पेठ तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा अनमोल क्षण ठरावा अशी ऐतिहासिक कामगिरी फलटणच्या सुपुत्राने केली आहे. AMATEUR SOFT HOCKEY FEDERATION OF INDIA यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 1st South Asian Soft Hockey Championship 2026 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी फलटण शहरातील श्री. लखन नंदकुमार मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा दि. 20, 21 व 22 मे 2026 रोजी काठमांडू, नेपाळ येथे पार पडणार असून भारतासह नेपाळ, पाकिस्तान व भूतान हे देश सहभागी होणार आहेत. राजस्थानातील जयपूर येथे दि. 14 मे ते 18 मे दरम्यान आयोजित पाच दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिरात ऑल इंडिया सॉफ्ट हॉकी फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या उपस्थितीत भारतीय पुरुष व महिला संघाच्या कर्णधारांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये फलटणच्या लखन मोरे यांच्या नावाची घोषणा होताच फलटण तालुक्यात आनंदाची लहर पसरली. लखन मोरे यांचे माध्यमिक शिक्षण श्री. यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे झाले असून उच्च शिक्षण मुधोजी कॉलेज, फलटण येथे पूर्ण झाले. शिक्षणासोबतच हॉकीचे संस्कार आणि खेळाचे बाळकडू त्यांना या शैक्षणिक संस्थांमधून मिळाले. सन 2000 पासून यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान, घडसोली मैदान आणि मुधोजी कॉलेज मैदानावर मेहनत घेत घडलेला हा खेळाडू आता भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने फलटणच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटणच्या ऐतिहासिक नगरीच्या मातीत घडलेला हा खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याने मंगळवार पेठ, कसबा पेठ तसेच संपूर्ण शहरातील नागरिकांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. या यशामागे योगदान देणारे शिक्षकवर्ग, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, ज्युनियर व सिनियर खेळाडू तसेच संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आता सर्वांचे लक्ष काठमांडू येथे होणाऱ्या स्पर्धेकडे लागले असून, विजयश्री संपादन करून लखन मोरे पुन्हा फलटणच्या मातीत परततील, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.