फलटण तालुक्यातील विडणी येथील परमपूज्य सद्गुरु शिवाजी महाराज मंदिरात रविवारी (दि. ७ जून २०२६) भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन भाविकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
सकाळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पदुकांचे मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. यावेळी, श्री सद्गुरू शंकर महाराज पादुका, श्री सद्गुरू शिवाजी महाराज समाधी,श्री सद्गुरू कुलकर्णी महाराज (आईसाहेब)मूर्ती,श्री सद्गुरू विठ्ठल महाराज(तात्या)समाधीस अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्रींची महाआरती संपन्न झाली. पुढे श्री शंकरगीता पारायणास प्रारंभ झाला. या धार्मिक सोहळ्यास भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पारायणानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा भव्य धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. अध्यात्मिकतेला फलटण च्या पत्रकारांनी मोठी साथ देत आध्यात्मिक पत्रकारिता जपली असल्याची भावना धनकवडी(पुणे)येथील शंकरमहाराज मठातील भक्तांनी व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले
या कार्यक्रमाचे आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांच्या पुढाकाराने करण्यात आले.व्यासपीठ चालक सौ. उर्मिलाताई निवंगुणे यांच्या सह फलटण येथील सद्गुरू हरिबाबा मंदिर येथील ओम दत्त ओम चिले भजनी मंडळ व स्वामी समर्थ मंडळ फलटण यांच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.