फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपालिकेतील एक ठराविक विनोदी कर्मचारी सध्या प्रशासकीय नियमांची पायमल्ली करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शासकीय नियमानुसार एकाच टेबलवर किंवा कार्यालयात ठराविक कालावधीपेक्षा जास्त काळ काम करता येत नाही. मात्र, हा ‘विनोदी’ कार्यपद्धती असलेला कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसला असून, तो पालिकेचा कर्मचारी आहे की वैयक्तिक ‘गडी’, असा सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे.
संबंधित कर्मचाऱ्याच्या पाठीशी कोणत्या शक्तीचा हात असल्याची चर्चा शहरात वारंवार होत आहे. त्यामुळेच हा कर्मचारी सामान्य नागरिकांची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतो, तर जवळच्या मर्जीतील कामांसाठी तत्परता दाखवतो. “जनतेच्या करातून पगार घेणारा हा कर्मचारी नगरपालिकेची सेवा करण्याऐवजी खासगी आणि पैसे घेऊन अंतर्गत कामे करण्यातच धन्यता मानत आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी कामासाठी येणाऱ्या नागरिकांना लुबाडण्याचे काम करत असून, पाठबळ असल्याने कोणालाही जुमानत नाही. कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला सन्मानाची वागणूक देण्याऐवजी त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने वागणे, कामात तांत्रिक अडचणी काढणे आणि लाचखोरीला खतपाणी घालणे असे प्रकार या कर्मचाऱ्याकडून घडत असल्याचे बोलले जात आहे.
एकाच जागेवर अनेक वर्षे पाय घट्ट रोवून बसलेल्या या कर्मचाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करावी किंवा त्याची बदली करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने जर यावर वेळीच कारवाई केली नाही, तर आक्रमक झालेले नागरिक नगरपालिकेच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकून तीव्र निषेध नोंदवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने या कर्मचाऱ्याचा जादा झालेला कार्यकाळ तपासावा आणि त्याला तत्काळ कार्यमुक्त करावे. फलटण नगरपालिका ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे, याचे भान प्रशासनाने ठेवावे.”