डेक्कन चौकातील वाहनतळावर १० बाय १० फुटांच्या जागा; परवानाधारक विक्रेत्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
फलटण प्रतिनिधी : दिवाळी सण २०२६-२०२७ च्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील परवानाधारक फटाके विक्रेत्यांसाठी फलटण नगरपरिषदेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फटाका विक्री स्टॉल उभारण्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीच्या डेक्कन चौक येथील वाहनतळावरील मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या ठिकाणी प्रत्येकी १० बाय १० फुटांच्या जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या जागांसाठी माफक भाडे आकारण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे.
शहरातील ज्या परवानाधारक फटाके विक्रेत्यांना दिवाळीच्या काळात विक्री स्टॉल उभारण्यासाठी जागा भाड्याने हवी आहे, त्यांनी नगरपरिषदेच्या जनरल वसुली विभागाकडे रीतसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यामुळे इच्छुक परवानाधारक फटाके विक्रेत्यांनी वेळेत अर्ज सादर करून जागा उपलब्धतेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.