मुधोजी हायस्कूलचा इंद्रजीत गुंजवटे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र! सांगली येथील विभागीय स्पर्धेतून निवड; जळगाव येथे १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय स्पर्धा
फलटण : आपलं फलटण येथील मुधोजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेला इंद्रजीत मयूर गुंजवटे याची १७ वर्षांखालील गटाच्या शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळविले आहे. राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान जळगाव येथे होणार असून, या स्पर्धेत इंद्रजीत सातारा विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. फलटणच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. इंद्रजीतच्या या यशामुळे त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इंद्रजीत हा फलटणचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांचा नातू आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संस्थेचे सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे पदाधिकारी, मुधोजी हायस्कूलचे शिक्षक, क्रीडाप्रेमी व मित्रपरिवाराने त्याचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.