फलटण: आपलं फलटण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या उर्वरित बिलापोटी प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे एकूण १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपयांची रक्कम ११ हजार ७८५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केली आहे. गुरुवारी (दि. २९) करण्यात आलेल्या या रकमेच्या वितरणामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. दि. २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेतकरी मेळाव्यात कारखाना व्यवस्थापनाने दसऱ्यानंतर उर्वरित बिल देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही रक्कम वितरित करण्यात आली. ऊस उत्पादकांना वेळेत त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी, या उद्देशाने व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले. “शेतकरी हा साखर कारखानदारीचा कणा असून, त्याच्या हिताला प्राधान्य देणे हेच आमचे समाजकारण आहे,” असेही त्यांनी नमूद केले. शेतकरी मेळाव्यात उर्वरित बिलासह आगामी हंगामातील ऊसलागवडीचे नियोजन, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती, प्रतिएकरी उत्पादन व टनेज वाढविण्याचे तंत्र आणि कारखान्याचे आगामी लागवड धोरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे ऊस उत्पादकांना आर्थिक व्यवहारांसोबतच उत्पादनवाढीसाठी आवश्यक माहितीही मिळाली. यावेळी फायनान्स जी.एम. अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागणवर, दिगंबर माने, युनियन सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पै. संतोष भोसले, सुहास गायकवाड, पोपटराव भोसले आणि ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यात संबंधित रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.