अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी खासदार आमदारांनी एक महिन्याचे वेतन द्यावे – डॉ. शिवाजी गावडे फलटण माण खंडाळा व बारामती तालुक्यात कापूस विमा मिळाला पाहिजे
फलटण प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी महाराष्ट्रातील 48 खासदार तसेच 288 आमदारांनी त्याचबरोबर राज्यसभा व विधान परिषदेतील आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देऊन त्याची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पाणी अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान तर झालेच होते त्यावेळी राज्य सरकारने महसूल विभागाच्या मदतीने पंचनामे केले त्यापैकी फक्त दोन ते तीन टक्के लोकांना ती तुटपुंजी मदत मिळाली मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मे महिन्यातील झालेल्या नुकसानीची अद्याप मदत मिळाली नाही त्यातच गेली आठ ते दहा दिवस झालं प्रचंड पावसाने हातात तोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत वाहून गेली त्यामध्ये खास करून फलटण पूर्व भागातील कापूस काढणी वेळेस सतत पावसामुळे शेतात गुडघ्याएवढा चिखल झाल्याने त्याचबरोबर सतत संततधार पावसाने कोणतीही शेतीची कामे होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्याने लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने भरीव अशी आर्थिक मदत करणे क्रमप्राप्त आहे मात्र सध्या राज्य सरकारचे आर्थिक गणिते कोलमडल्याचे पाहायला मिळत असल्याने सर्वच महाराष्ट्रातील आमदार खासदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये देऊन राज्यातील शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी ेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यातील काही चुकीच्या पद्धतीमुळे विमा करण्यास कंपन्या टाळाटाळ करीत असल्याने राज्य सरकारने त्या कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना योग्य तो समज देत इथून पुढे शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचा विमा मोफत उतरवून त्याचा प्रीमियम राज्य सरकारने भरावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पाणी अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव गावडे यांनी केली आहे.
चौकट – गोखळी ता. फलटण येथे तब्बल 200 लोकांचे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले होते मात्र त्या वेळची फक्त 17 लोकांनाच आर्थिक मदत आली असून इतर शेतकऱ्यांना ती मदत कधी मिळणार असा प्रश्न सुद्धा डॉ. शिवाजी गावडे यांनी विचारला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी लक्ष घालावे….
चौकट -फलटण माण, खंडाळा तसेच बारामती तालुक्यातील कापूस पिक विमा योजना राबविण्यात येत नाही ती लागू करावी अशीही मागणी डॉ. शिवाजी गावडे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.