फलटण येथील पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपीक याने आपल्या पदाचा गैरवापर करीत तब्बल वीस लाख रुपयांचा चुना शासनाला लावला आहे. या प्रकरणाने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्याची बदली पाटण येथे झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे फलटण पंचायत समितीला चांगलाच “पठाण”लागला आहे, अशी चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात सुरू आहे.
फलटण पंचायत समिती येथे कनिष्ठ अभियंताने पोर्टलवर आपली सॅलरी परिपत्रकात वाढ करून आपला पगार वाढवून तब्बल वीस लाख रुपये उकळले आहेत. त्याच्या या प्रतापाने फलटण पंचायत समितीचा भोंगळ कारभार अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. सन २०२३ते 2025 या काळात हा अपहार केला असून, त्याची माहिती मिळताच विभागीय चौकशी सुरू झाली आहे, असे सांगण्यात आले आहे. त्या पठ्ठ्याने अगोदर खंडाळा, नंतर फलटण अन् आता पाटण असा प्रवास केला आहे. गेली चार वर्षे झाली प्रशासन राजवट फलटण पंचायत समिती मध्ये आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा अपहार केला असून, कुंपणच शेत खात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांनी चुना लावला असल्याचे समोर येत असून प्रशासकीय राजवटीतील झालेल्या संपूर्ण व्यवहाराची जिल्हा परिषदेच्या आर्थिक विभागाने चौकशी करून भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे. या पटठ्याने आपली स्वतःची सॅलरी(पगार) वाढवून तब्बल वीस लाख रुपयांचा चुना लावला असताना जिल्हा परिषद किंवा राज्य सरकारच्या आर्थिक विभागाला याची कल्पना नव्हती का? की अजून कोनीकोनी असाच गैरप्रकार केला आहे का? याचा खोलात जाऊन याची संपुर्ण चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.
चौकट – मंत्री गोरेंनी कमिटी नेमावी फलटण पंचायत समितीच्या कारभाराची आत्तापर्यंतच्या काळात अनेक प्रकरणे बाहेर पडली होती. मात्र, कारवाईचा बडगा वरिष्ठ अधिकारी कधीच उगारत नाहीत . यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निवृत्त न्यायाधीशांची कमिटी नेमून फलटण पंचायत समितीच्या कू कारभाराचा भांडाफोड करावा, अशी मागणी होत आहे.
चौकट – या प्रकरणाबाबत प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोमले यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की याची चौकशी सुरू आहे.
चौकट – सीईओनी चौकशी करावी फक्त स्वतःच्या फायद्याकरिता या पटठ्याने हा आर्थिक घोटाळा केला आहे का? की अजून कोणते अधिकारी, कर्मचारी किंवा रॅकेट या मागे आहे, याचा सखोल चौकशी सीईओ याशनी नागराजन यांनी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.