फलटण प्रतिनिधी – फलटण दहिवडी मार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनींना मोबदला न देताच रस्त्याचे काम सुरू केले असून संबंधित ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात असून या कामामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे दिसून येत आहे मात्र त्यांच्या जमिनी अधिग्रहण न करताच रस्त्याचे काम सुरू झाले असल्याने व या कामाबाबत कोणतेही संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी हे शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसून या विरोधात दुधेबावीचे शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी हे काम बंद पाडले आहे.
फलटण – दहीवडी विटा राष्ट्रीय महामार्ग क्र १६० या रस्त्याला मूर्त स्वरूप मिळाले असून अरुंद रस्ता असल्याने या महामार्गवर तसेच घाटात मोठमोठे अपघात होत होते. या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाश्यांना अपघात व वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागत होता. यामुळे हे काम होणे गरजेचे होते,नव्याने सुरू रुंदीकरणाबाबत कोणत्याही ग्रामस्थांना/शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना विश्वासात न घेता महामार्गाचे रूंदीकरणाचे काम ठेकेदाराने रेटून सुरू केले आहे. याबाबत शेतकऱ्यांना प्रशासन व कॉन्ट्रॅक्टर यांनी विश्वासात न घेता काम सुरु केले असून रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम पुर्ण होऊ देणार नसल्याचा इशारा दुधेबावी येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. सद्यस्थिती दुधेबावीत शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम पुर्णपणे बंद केले असून पुढे माण तालुक्यात मोगराळे आणि बिजवडी येथेही काम बंद पाडले आहे.याबाबत शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.दुधेबावी गावातील ज्या शेतकरी बांधवांची घरे, दुकाने,विहिरी, झाडे रस्त्यामध्ये जाणार आहेत त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जर म्हणत असतील की सध्या आहे एवढाच रस्ता होणार आहे तर मग आमच्या शेतात मोजणी करून खांब कशासाठी रोवले आहेत?.शेतकऱ्यांचे नुकसान करून सरकारला नेमका कसला विकास करायचा आहे? असा सवालही यावेळी दुधेबावीतील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
चौकट – महामार्ग रुंदीकरणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही रस्त्याचे काम होऊ देणार नाही. तशी वेळ आल्यास आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करू वेळप्रसंगी आत्मदहनही करू.